Thursday 27 May 2021

गुणवत्तापूर्ण कौशल्यवर्धित शिक्षण

 


भारताला येत्या काळात सुमारे पाच कोटी व्यवसाय कौशल्य असणाऱ्या कुशल मनुष्यबळाची विविध क्षेत्रात गरज आहे. एकटया महाराष्ट्रात ५० लाख व्यवसाय कौशल्य असणाऱ्या मनुष्यबळाची गरज आहे. परंतु अशा कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळाचा दुर्देवाने तुटवडा आहे.

कौशल्य विकास हा शिक्षणाचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. यासाठी समाज आणि शिक्षण क्षेत्रात कौशल्य विकास म्हणून काय बदल करायचे यावर विचार करायला हवा.

सध्या औद्योगिक मंदी आणि यांत्रिकीकरणामुळे दिवसेंदिवस नोकऱ्यांच्या संख्येत बदल होत आहे. औद्योगिक जगताच्या मागणीनुसार शैक्षणिक अभ्यासक्रम निश्चित करावा लागेल. नोकरी संदर्भात येणाऱ्या जाहिरातींची मागणी वेगळी असते आणि मुलांचे प्रशिक्षण वेगळे असते. असे चित्र दिसते. अंगी कौशल्य असले की स्पर्धेच्या युगातही रोजगाराच्या अनेक वाटा निर्माण होतात. त्यासाठी कौशल्य शिक्षणाची गरज आहे.

प्रत्येक मुलाला आणि कोणत्याही मुलाला उत्तम ऐकता येणे, बोलता येणे, वाचता येणे आणि लिहिता येणे या माध्यमातून जगण्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा आत्मविश्वासपूर्वक निवडता येणे, यालाच गुणवत्तापूर्ण कौशल्यवर्धित शिक्षण म्हणता येईल. यात मुलांमधील कल्पकतेला वाव मिळणे, हाताने काही करण्याची उर्मी निर्माण होणे, उत्साहपूर्वक वातावरण असणे, निर्भयता अंगी येणे यांसारख्य अनेक गोष्टी येतात.

शिक्षण या शब्दाची व्याख्या, स्वरूप वेगळं असल्यामुळे पूर्वी जी मंडळी तथाकथित शिक्षणप्रवाहात नसली, तरी त्यांनी जे (अनेक क्षेत्रात) उभं केलं ते कदाचित त्या अर्थाने शिकलेली मंडळी करू शकत नाहीत असं लक्षात येतं. अनुभव संशोधन निर्मिती, नोंदी, भूमिका अशा अनेक गोष्टी या संदर्भात महत्त्वाच्या आहेत. पूर्वी विविध प्रकारची कौशल्य माणसाच्या अंगी होती. ती पुढील पिढीत देण्याची रचनाही समाजात होती. लहान मुलाला हिशोब पटकन करता येत होता. कागदच नव्हता, छपाई नव्हती तरी प्रचंड मुखोद्गततेच्या स्वरूपात लेखन झालं. हळूहळू वेगवेगळे लोक येत गेले. अनेक गोष्टी आम्ही स्वीकारल्या. यातून संस्कृती घडत गेली. लोककलातून ती साकारू लागली.


नेमकी गडबड कुठे झाली? ब्रिटीश आले, येतांना त्यांचे शिक्षण घेऊन आले, जातांना ते ठेऊन गेले.

Wednesday 26 May 2021

कौशल्य शिक्षण : एक नवी पहाट

 


“भारतातील जवळपास ८० टक्क्यांपेक्षा जास्त युवक हे कोणत्याही प्रकारच्या नोकरीसाठी नेमण्यास उपयुक्त नाही.” असे खळबळजनक पण धक्कादायक वाटणारे विधान इन्फोसिस कंपनीचे संस्थापक अध्यक्ष नारायणमूर्ती यांनी केले. आसपास थोडीशी डोळसपणे नजर फिरविली तरी मूर्तींच्या म्हणण्यातील उव्दिग्नता आपल्या लक्षात येईल. आज देशातील ५० हजारांपेक्षा अधिक नोकऱ्या आवश्यक कुशल मनुष्यबळाअभावी पडून असल्याचा अहवाल एका अर्थविषयक मासिकाने नुकताच प्रसिद्ध केला आहे. शिक्षण हा जीवनाचा अविभाज्य पाया समजला जातो. आयुष्याचे जवळपास २० टक्के दिवस आपण शिक्षण घेण्यामध्ये घालवतो, त्यानुसार नोकरी मिळते. ब्रिटीश शिक्षण पद्धतीमध्ये फक्त भाषा (इंग्रजी) आणि शास्त्र याविषयांवर भर होता. हळूहळू कौशल्य विकास शिक्षणातून लुप्त होत गेला. गेल्या पन्नास वर्षात शिक्षण क्षेत्रामध्ये ज्ञानही वरवर दिले जाते. पदवीधर व्यक्तीचे ज्ञानही सखोल नसते आणि काही कौशल्य अंगी बाणलेले नसते. कमालीच्या पुस्तकी, साचेबंद, बदललेल्या मार्केट किंवा परिस्थितीच्या गरजांपासून आणि तरीही दिवसेंदिवस खर्चिक बनत चाललेल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेकडे पुस्तकी आणि ‘घोकलेल्या’ माहितीपलीकडे न जाऊ शकणारे आणि मुलभूत कौशल्याचा अभाव असणारे मनुष्यबळ आपली शिक्षणव्यवस्था ‘घाऊकपणे’ जन्मास घालत आहे. बदललेल्या बाजारपेठांच्या गुंतागुंतीच्या गरजांमध्ये ज्यांचा उपयोग काडीमात्र नाही. त्यामुळे फक्त १५ ते २० टक्के पदवीधर नोकरीयोग्य आहेत, असे अभिप्राय बऱ्याच कंपन्यांकडून मिळतात.

डॉ. मर्मर मुखोपाध्याय यांचं ‘Total Quality Management in Education’ हे पुस्तक गुणवत्तेचा विचार करणाऱ्या सगळयांनीच वाचलं असावं. त्यात अमेरिका, जपान यांसारख्या प्रगत देशांतील गुणवत्तेची संकल्पना मांडली गेली. आपणही असा विचार करावा असं कुणाकुणाच्या मनात आलं. आपणही त्याच संकल्पनेचं अनुकरण करावं का? जगभरात शिक्षणात बदल होतोय. हा बदल आपणही करायचं ठरवू या का? आपल्या देशाची विविध राज्यांतील विविध स्तरांतील स्थिती, गती समजून याची मांडणी करावी का? करायला हवी का? का जसंच्या तसं आपण 'राबवू या'? गुणवत्ता म्हणजे काय? म्हणजे आधी ती आहे असं गृहीत धरणं आणि मग शैक्षणिक गुणवत्तेचं व्यवस्थापन करणं असं घडायला हवं का? गुणवत्ता आहे असं कोणत्या निकषावर आपण ठरवणार आहोत? याचा विचार व्हायला हवा...

गुणवत्तापूर्ण कौशल्यवर्धित शिक्षण

  भारताला येत्या काळात सुमारे पाच कोटी व्यवसाय कौशल्य असणाऱ्या कुशल मनुष्यबळाची विविध क्षेत्रात गरज आहे. एकटया महाराष्ट्रात ५० लाख व्यवसाय क...